बदलीसाठी दुर्गम भागातील शिक्षकांचे आजपासून साखळी उपोषण
2022-05-17 15:08:58
गडचिरोली : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या मागील ४ वर्षापासून रखडल्याने , आज १७ मे पासून म. रा.दुर्गम क्रांती शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद गडचिरोली समोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे जुने धोरण २७ फेब्रुवारी२०१७ नुसार दरवर्षी ३१ मे अखेर ऑनलाईन पदधतीने बदल्या करण्यात येतात.परंतु गडचिरोली जिल्ह्यात मात्र सन २०१८ नंतर बदल्याच झालेल्या नाहीत. शासनाने दिनांक ७ एप्रिल २०२१ ला बदलीचे नवीन धोरण आणून बदली अभ्यासगट निर्माण केला व या अभ्यासगटाने राज्यभर शिक्षक संघटना, जिल्हा परिषद पदाधिकारी यांची मते जाणून घेऊन नवीन सॉफ्टवेअर तयार केले परंतु बदलीची ३१मे ही तारीख जवळ आलेली असतानाही शासनाला ते सॉफ्टवेअर रन करून बदली प्रक्रिया सुरू करण्याचा अजूनही मुहूर्त सापडलेला नाही.त्यामुळे वर्षानुवर्षे जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागात आपल्या कुटुंबापासून दूर राहून, सेवा बजावित असलेल्या शिक्षकांमध्ये शासनाप्रती असंतोष निर्माण होऊन त्याचे पर्यावसान साखळी उपोषणात झालेले आहे. आज संघटनेतर्फे एकूण ९ महिला रणरागिणी साखळी उपोषणास बसलेल्या असून, जोपर्यंत बदली पोर्टल सुरू होत नाही, तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केलेला आहे. प्रसंगी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य दुर्गम क्रांती शिक्षक संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेले आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील बहुतेक शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिलेला असून, लढा तीव्र करण्याचा आग्रह केलेला आहे.याप्रसंगी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व दुर्गम क्रांतीचे शिलेदार व संघटनेचे राज्य पदाधिकारी राजेश रोकडे, वैशाली मडावी, वैशाली बोरकर, जिल्हाध्यक्ष किशोर कुरवटकर, जिल्हा सरचिटणीस धनराज पोरटे, देवनाथ बोबाटे,दिवाकर पिपरे,राजू मुरवतकर, कविता आंबोरकर , रोशनी राखडे उपस्थित होते.